धाराशिव (प्रतिनिधी)-  वॉटर शेड ऑर्गनायझेशन ट्रस्टच्या माध्यमातून जिल्ह्यात पाणी, स्वच्छता,शिक्षण,आरोग्य व रोजगार या बाबींवर काम करण्यात येत आहे.याबरोबरच पाणी व स्वच्छते संदर्भात वॉटर शेडने तयार केलेल्या पाणी व स्वच्छता माहिती पुस्तिकेमध्ये आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची माहिती संकलित केलेली आहे.त्यामुळे ते पुस्तक जिल्ह्यातील प्रत्येक गावांसाठी उपयुक्त असून त्या पुस्तकाच्या प्रती जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये वितरित करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष यांनी आज 2 सप्टेंबर रोजी केले.

जिल्हा परिषदेच्या कै यशवंतराव चव्हाण सभागृहात वॉटर शेड ऑर्गनायझेशन ट्रस्टच्यावतीने तयार करण्यात आलेल्या पाणी व स्वच्छता या पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.घोष यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. 

डॉ.घोष पुढे म्हणाले की,शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या पिण्याचे पाणी प्रत्येकाला स्वच्छ मिळेल यासाठी प्रयत्न करावेत.तर स्वच्छता संदर्भात सर्व नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्यासह शौचालयाचा वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे घराची स्वच्छता करण्यासह परिसर व पर्यायाने संपूर्ण गावाची स्वच्छता केल्यास गावातील प्रत्येक नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज राऊत,ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कटकदौंड,उपकार्यकारी अभियंता बप्पासाहेब ढवळे,उपअभियंता नरेंद्र भुसारे,दत्तात्रय पाचंगे,अरविंद सिद्राल,एस के शिंदे (यांत्रिकी) पवार (देखभाल दुरुस्ती),वाटर संस्थेचे प्रतिनिधी आदेश ठोंबरे यांच्यासह शाखा अभियंता अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top