धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे, जमिनीचे अतोनात नुकसान झालेले असून अनेक घरांची पडझड झालेली आहे  तसेच मोठ्या प्रमाणात जनावरे ही दगावलेली आहेत शासनाने तात्काळ पंचनामे  करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत करून जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

जिल्ह्यामध्ये रविवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा एकदा कहर केला आहे. जिल्ह्यातील परांडा, भूम, वाशी तसेच कळंब तालुक्यामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे  ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालेले आहे. ओढे,नदी- नाल्यांना पूर आलेला आहे या पावसाने मनुष्यहानी बरोबरच अनेक जनावरेही  दगावलेली  आहेत सर्व पिके पाण्याखाली गेलेली आहेत. लोकांची घरी पाण्यामध्ये गेल्यामुळे ग्रामस्थ बेघर झालेले आहेत. भूम, परंडा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे अनेक तलाव फुटल्याने शेतात, घरामध्ये लोकं पाण्यामध्ये अडकलेली असून त्या लोकांना एनडीआरएफ व आर्मीची टीम बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तरी शासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व आर्थिक मदत करावी.

 
Top