धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. मारुती अभिमान लोंढे लिखीत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बीए भाग दोन या अभ्यासक्रमावर आधारित महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हे 34 वे पुस्तक दि.23 सप्टेंबर 2025 रोजी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संदीप देशमुख यांच्या शुभहस्ते प्रकाशित करण्यात आले.
यावेळी ते म्हणाले की, प्रा. डॉ.मारुती लोंढे यांचे 34 वे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हे पुस्तक अत्यंत उपयुक्त असे पुस्तक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार लिहिलेले हे त्यांचे पुस्तक असून,सदर पुस्तकामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल. डॉ. मारुती लोंढे यांनी संशोधनांमध्ये आणि पुस्तक लेखनामध्ये मोलाची भर घातलेली आहे ही बाब भूषणावह आहे, असे देखील ते यावेळी म्हणाले. इतर प्राध्यापकांनी देखील संशोधनांमध्ये आणि प्रकाशनामध्ये आपण करिअर करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पुस्तक प्रकाशनाबद्दल प्रा.डॉ.मारुती लोंढे यांनी आभार व्यक्त करताना महाविद्यालयाचे तरुण, प्रयोगशील प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांच्या शुभहस्ते हे पुस्तक प्रकाशित झाले.आणि त्यांनी यावेळी दिलेल्या शुभेच्छा यामुळे माझी ऊर्जा द्विगुणित झाली आहे असे ते यावेळी म्हणाले. पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल प्रा. डॉ. मारुती लोंढे यांनी सर्वांचे आभार मानले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.वैभव आगळे यांनी केले तर आभार डॉ. दत्तात्रय साखरे यांनी मानले. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
