धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने एमआयडीसी परिसरातील एका बंद पडक्या इमारतीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून आठ जणांना रंगेहात पकडले. या कारवाईतून तिरट नावाचे जुगार साहित्य, रोख रक्कम व मोबाईल असे एकूण 68 हजार 380 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पोलीस उप विभागीय कार्यालयातील पथक पेट्रोलिंग करत असताना तेरणा टी-पॉईंट परिसरात पोहोचले. त्यावेळी पो. ह. काझी (पो.ठाणे आनंदनगर) यांच्या सह गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार एमआयडीसी कार्यालयाच्या पाठीमागील एका बंद पडलेल्या इमारतीत काही इसम जुगार खेळत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. सदर माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांना कळवून त्यांच्या आदेशानुसार पंचांच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला.
या कारवाईत आयान अली अहमद अली कुरेशी (22, रा. रमाई नगर), प्रतीक परमेश्वर जाधव (24, रा. शिवछत्रपती नगर), प्रशांत महादेव कांबळे (29, रा. दत्तनगर, येडशी रोड), अविनाश विनायक चव्हाण (28, रा. शिंगोली तांडा), विशाल सिद्धार्थ सातदिवे (26, रा. शालिमार हॉटेल मागे), इस्माईल अलीम शेख (27, रा. शालिमार कॉलनी), अजीम सलीम शेख (26, रा. शालिमार कॉलनी, एमआयडीसी रोड), एजाज शौकत तांबोळी (22, रा. शालिमार कॉलनी, एमआयडीसी रोड) असे आठ जण रंगेहात पकडले गेले. त्यांच्या ताब्यातून तिरट नावाचे जुगार साहित्य, रोख रक्कम व मोबाईल जप्त करून पंचनामा करण्यात आला.
पो.हे.कॉ. हुसेन सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदर आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4,5 प्रमाणे आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे एमआयडीसी परिसरातील अवैध जुगार व्यवसायाला मोठा धक्का बसला असून, अवैध धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलीस यंत्रणेला यश आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफाकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत यांच्या नेतृत्वाखाली, पो. हे.कॉ. हुसेन सय्यद, पो. ना. पाटील, पो. कॉ. गरड, सय्यद, ठाकूर तसेच चा.ह. लाटे यांच्या पथकाने केली.