धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहर व जिल्ह्यात दहा दिवसाच्या गणेश उत्सवानंतर शनिवार दि. 6 सप्टेंबर रोजी विविध देखावे सादर करत, पारंपारिक वाद्य वाजवित श्री गणेशाला निरोप देण्यात आला. 

धाराशिव सह जिल्ह्यात सकाळी 11 वाजल्यापासूनच काही ठिकाणी श्री विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या होता. या मिरवणुकीमध्ये ढोल, ताशा, झांज पथक, लेझीम, बॅन्ड सह, भांगडा नृत्य, आदिवासी नृत्य, देशभक्ती पर देखावे आदी सादर करत भव्य मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. पुणे येथील देखाव्याच्या बरोबरीने धाराशिव शहरात देखावे व मिरवणुकीतील कलाअविश्कार पाहण्यासाठी शहरवासियांनी रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती. जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुका अंत्यत शांततेत पार पडल्या. जिल्ह्यातील तुळजापूर, लोहारा, उमरगा, कळंब, वाशी, परंडा, भूम या तालुक्यातील गणेश विसर्जन मिरवणुका रात्री 12 वाजेपर्यंत चलल्या. तर धाराशिव शहरातील विसर्जन मिरवणूक रविवार दि. 7 सप्टेंबरच्या पहाटे 3 वाजेपर्यंत चालल्या. 

 

राजकीय किलगीतुरा

धाराशिव शहरातील काळा मारूती मंदिराजवळ गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी व मिरवणुकीची पाहणी करण्यासाठी भाजप व ठाकरे गटाच्या शिवसेनेचे दोन वेगवेगळ्या ठिकाणी स्टेज उभारले होते. भाजपच्यावतीने शिस्तबंध मिरवणूक यासाठी बक्षीसे जाहीर केले होते. यावेळी ध्वनीक्षेपनावरून भाजप व शिवसेना एकमेकांच्या विरोधात घोषणा देवून लागल्यामुळे राजकीय किलगीतुरा रंगल्याचे दिसत होते. यावेळी भाजपच्या स्टेजवरून प्रतिकात्मक गाणे लावून शिवसेनेच्या स्टेजकडे पाहून आव्हान दिले जात होते. भाजपाच्या स्टेजवर मल्हार पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, नितीन काळे, भाजप शहराध्यक्ष अमित शिंदे, ॲड. नितीन भोसले यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. तर शिवसेनेच्या स्टेजवर खासदार ओमराजे निंबाळकर सह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



 
Top