धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद कन्या प्रशाला धाराशिव येथे खासदार ओमप्रकाशजी राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार विक्रम काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत गटशिक्षण कार्यालय पंचायत समिती धाराशिव अंतर्गत 2024-2025 व 2025-2026 सालचा तालुकास्तरीय शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संतोष नलावडे गटविकास अधिकारी यांनी स्थान भूषविले. या सोहळ्यात दोन्ही वर्षाचे मिळून 35 शिक्षकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच गटशिक्षण कार्यालयाअंतर्गत गुणवंत विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, साधनव्यक्ती, विषयशिक्षक, कर्मचारी असे जवळपास 15 जणाना गौरविण्यात आले. तसेच 2023 - 2024 व 2024 - 2025 मधील भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत दोन्ही वर्षाचे मिळून 12 शाळांना “मुख्यमंत्री माझी समृद्ध शाळा “पुरस्कार प्रदान करण्यात आला . यावेळी मा खासदार, आमदार साहेबांनी सदर कार्यक्रम शिक्षक दिनी घेतल्या बद्ददल कार्यालयाचे अभिनंदन केले तसेच समाज घडवण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा असून त्यांचा गुणगौरव हा अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगितले. हा सोहळा गटविकास अधिकारी संतोष नलावडे, गटशिक्षणाधिकारी सय्यद असरार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख तसेच सर्व कार्यालयीन कर्मचारी यांच्या परिश्रमाने व सहकार्याने उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी सर्व संघटनांचे विविध पदाधिकारी व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सय्यद असरार गटशिक्षण अधिकारी यांनी केले. तर आभार बापू शिंदे विस्तार अधिकारी यांनी केले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विशाल सुर्यवंशी व डॉ.शहनाजबानो औसेकर यांनी केले.
