मुरुम (प्रतिनिधी )- आजची पिढी आपला हिरो किवा आदर्श कोणाला मानतात हे कळतच नाही. त्यासाठी आपले आदर्श कोण हे तपासायला पाहिजे. तरच कष्ट करायची जाणीव होईल. आणि त्या कष्टाला सरावाची आणि प्रयत्नाची जोड दिली तरच युवक स्वतःच स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार बनतील. प्रचंड कष्ट करण्याची तयारी, प्रयत्नातील सातत्य आणि वाचनाचा सराव हे चार आधारस्तंभ युवकांना स्वतःच त्यांचे जीवन घडवण्यासाठी शिल्पकार म्हणून तयार करतील असे मत वारणानगर येथील प्रा. डॉ. प्रीती शिंदे यांनी व्यक्त केले. शनिवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात आयोजित कर्मयोगी श्रीधररावजी मोरे व्याख्यानमालेचे दुसरे पुष्पगुंफताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भारत शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ. सुभाषराव वाघमोडे होते. प्राचार्य डॉ. संजय अस्वले आणि प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव याची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. प्रीती शिंदे म्हणाल्या की जीवन सुंदर आहे आणि ते अधिक सुंदर घडविण्यासाठी युवकांना स्वतःला शिल्पकाराची भूमिका पार पाडावी लागेल, त्यासाठी प्रचंड कष्टाची तयारी ठेवून प्रयत्नातील सातत्य हेच तुम्हाला ध्येय सिद्धी पर्यंत पोहचवू शकतात. कष्टाच्या घामाने आंघोळ करणारा माणूस स्वतःचे जीवन घडवू शकतो. अध्यक्षिय समारोप करताना डॉ. सुभाष वाघमोडे यांनी समाज परिवर्तनासाठी वैचारिक प्रबोधनाची गरज यावेळी त्यांनी व्यक्त केली. उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, उपप्राचार्य डॉ. पद्माकर पिटले, प्रा. जी. एस. मोरे, पर्यवेक्षक शैलेश महामुनी, डॉ. अशोक पदमपल्ले, शहरातील नागरिक, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. धनराज ईटले यांनी केले तर डॉ. डी. बी. ढोबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.