मुरुम (प्रतिनिधी )- उमरगा येथील सुकन्येने सातासमुद्रापार भरारी घेत युनिव्हर्सिटी कॉलेज बर्मिंगहॅम, इंग्लंड मध्ये बेकिंग पिटासरी ॲड टेक्नॉलॉजी मध्ये पदवी केली प्राप्त.
सविस्तर माहिती अशी की ऐश्वर्या पाटीलचा हा प्रवास साधा सोपा सरळ नव्हता. श्री. श्री. रविशंकर स्कूल, उमरगा येथून ऐश्वर्या नामक चिमुरडी ने आपल्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात केली. पुढे तिने माध्यमिक शिक्षण देशी केंद्र, लातूर तसेच विमलताई गरवारे हायस्कूल, पूणे असे स्थलांतर करीत दवे पब्लिक स्कूल, नवी मुंबई येथून विशेष प्राविण्यासह दहावी पास केली. महाविद्यालयीन शिक्षणासाठी डी. वाय. पाटील, नवी मुंबई येथे प्रवेश घेऊन बी. एससी. पदवी घेतली. या शिक्षणा दरम्यान शैक्षणिक सहली साठी जर्मनी, स्वित्झर्लंड बेल्जियम, स्पेन, फ्रांस, इटली आदी देशांत जाण्याची संधी मिळाली. या निमित्ताने बेकिंग आणि डिसोर्टस या संबंधी बरीच माहिती झाली. इथेच तिने मनोमन ठरवलं की यातच आपण करियर करायचं. असं म्हणतात माणसाच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी त्याच्या बालपणी अथवा किशोरवयीन अवस्थेत घडून जातात. शाळकरी वयात विविध प्रकारच्या पाककृती बनविण्यात अभिरुची दाखविणारी ही किशोरी उद्याची मास्टर असेल अशी कधी कुणी कल्पना ही केली नसेल.
ती तिच्या आज्या कै. दमयंती बब्रुवान मुळे आणि श्रीमती शकुंतला मधुकरराव कदम यांचे कडून भारतीय पारंपरिक सणावाराला खीर, पुरणपोळी, कटाची आमटी, वड्या आदी घरगुती पद्धतीचे तसेच वार्षिक साठवणूकीचे लोणचे,पापड, कुरड्या, सांडगे इत्यादी तिने छंद म्हणून शिकून घेतले होते. योगायोगाने पूढे थोड्या फार फरकाने हेच तिचे ध्येय ठरले.
डी. वाय. पाटील येथील पदवी शिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात तिने पुढील शिक्षणासाठी जागतिक स्तरावरील संधीचा स्वतः होऊन स्वतंत्रपणे विचार करत शोध घेतला. शेवटी प्रयत्नाला यश आले आणि लंडन येथील युनिव्हर्सिटी कॉलेज बर्मिंगहॅम येथे प्रवेश निश्चित केला. भारतात असताना कधी ही एकटीने प्रवास न केलेल्या या मुलीने इंग्लंड मधील पूढील तीन वर्षे एकटीने सारे प्रश्न हाताळले.
परदेशात जाऊन ही ती आपल्या मार्गदर्शक ,शिक्षक,गणगोत, मित्र मैत्रिणी, व्यवसायातील सहकारी यांचेशी ती कायम संपर्कात असते. अशा या गुणी मुलगीने युनिव्हर्सिटी कॉलेज, बर्मिंगहॅम (इंग्लंड) येथून मास्टर डिग्री दरम्यान लंडन येथील जग प्रसिद्ध रेस फार्म्युला १ सर्किट मध्ये फरारी कंपनी मध्ये फ्रंट स्टाॅलवर १ वर्षे व नंतर सलग दोन वर्षे तिथेच व्हिआयपी लॉंजवर अपॉईंटमेंट मिळाली. अशी संधी स्कॉलर नाच मिळते. ती तीने मिळविली.ही तिच्या शैक्षणिक जीवनातील अत्यंत अभिमानाची आणि गौरवपूर्ण मिळकत होती असे म्हणता येईल. उमरगा येथील यशवंत वसंतराव पाटील आणि डॉ. उमा पाटील यांच्या सुकन्येने मराठमोळ्या ऐश्वर्याने मास्टर डिग्री प्राप्त केल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.