धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील काही भागात 21 सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे व त्यामुळे आलेल्या पुरामुळे शेतपिकांचे व मालमत्तेचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर कधीही आली नव्हती.शेतकरी आज अडचणीत सापडला असताना सरकार भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही आपत्ती निवारण व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

जिल्ह्यातील भूम तालुक्यातील चिंचपूर (ढगे) गावाजवळील शेतकरी गणेश मोरे यांच्या शेतात अतिवृष्टी व पुराने नुकसान झालेल्या पिक नुकसानीची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी महाजन बोलत होते.यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक रितू खोखर,भूमचे उपविभागीय अधिकारी डोंगरे,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप सेंगलवार,जलसंपदाचे अधीक्षक अभियंता विजय थोरात, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भंडे,प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आसलकर,तहसीलदार जयंत पाटील यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

महाजन पुढे म्हणाले,मोठ्या प्रमाणात जमिनी खरडून गेल्या आहेत.विहिरी क्षतीग्रस्त झाल्या आहेत,नुकसानीची मदत करण्यासाठी तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.मुख्यमंत्री फडणवीस यांना देखील जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची जाणीव आहे.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नक्की मदत करण्यात येईल.असे त्यांनी सांगितले. परंडा तालुक्यातील वागेगव्हाण गावाला श्री.महाजन यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.तेथून जवळच असलेल्या थोरबोलेवस्ती आणि जगतापवस्ती येथून एनडीआरएफच्या पथकाने सुखरूप सुटका केलेल्या नागरिकांशी देखील त्यांनी संवाद साधला व सध्या या वस्तीत अडकून पडलेल्या नागरिकांशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांना धीर दिला.उदया सकाळी आपल्याला हेलिकॉप्टरच्या मदतीने सुखरूप आणण्यात येईल.असे त्यांना सांगितले.तसेच त्यांनी एनडीआरएफच्या जवानांसोबत सुरू असलेल्या बचावकार्याबाबत चर्चा करून माहिती घेतली.


 
Top