तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे जगणे उध्वस्त केले आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे थेट मागणी केली आहे की, शेतकऱ्यांना पंचनाम्याविना हेक्टरी 50 हजार रुपये सरसकट मदत द्यावी. “शेतात अधिकारी उतरण्याची परिस्थितीच नाही. सर्वत्र पाणी आहे, चिखल आहे. मग पंचनामा कशाचा करायचा? सरकारने वेळ न दवडता शेतकऱ्यांना थेट मदत जाहीर करावी.” मधुकरराव चव्हाण पुढे म्हणाले की, तुळजाभवानी मंदिर संस्थान पूर्वी अनेक नैसर्गिक संकटांत मदतीस धावून आले आहे. यावेळी धाराशिव जिल्ह्यातच हजारो शेतकऱ्यांचे पीक पाण्यात गेलं, घरगुती साहित्य वाहून गेलं, छोट्या व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे मंदिर संस्थाननेही अशा घटकांना मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, नवरात्र उत्सवाच्या तोंडावर रस्त्यांची दुर्दशा देखील त्यांनी उघड केली. तुळजाभवानी दर्शनासाठी आंध्रकर्नाटकातून मोठ्या प्रमाणात भाविक नळदुर्गतुळजापूर मार्गे पायी येतात. मात्र यावर्षी रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम झालेले दिसत नाही. साईड पट्ट्यांवरील गवत काढलेले नसल्याने भाविकांना अडचण होणार आहे.“भाविकांचा विचार करून प्रशासनाने तातडीने गवत काढावे व रस्ते दुरुस्त करावेत,”अशी ठाम मागणी चव्हाण यांनी केली.

 
Top