धाराशिव (प्रतिनिधी)- परंडा तालुक्यातील भोंजा हवेली हे छोटेसे खेडेगाव; मात्र आज ते प्रगत शेतीचे आणि शेतकरी आत्मनिर्भरतेचे प्रेरणास्थान ठरत आहे. दि.17 डिसेंबर रोजी भोंजा हवेली येथे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य केळी उत्पादक शेतकरी परिसंवाद उत्साहात पार पडला.या परिसंवादाने कोरडवाहू शेतीतून बागायतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशकथांना नवी दिशा दिली. यावेळी एआय तंत्रज्ञान, शासकीय योजना, मनरेगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी शेतीत परिवर्तन घडवावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले.
भोंजा हवेली गावातील सुमारे 90 टक्के शेतकरी पारंपरिक कोरडवाहू शेतीतून बाहेर पडत ऊस शेतीला बगल देऊन केळी व तुती लागवडीकडे वळले आहेत. मनरेगा अंतर्गत फळबागा, सिंचन सुविधा आणि तुती लागवड यामुळे अनेक शेतकरी आज लखोपती बनत आहेत. या यशस्वी परिवर्तनाची दखल घेत जिल्हा प्रशासन थेट शेतकऱ्यांच्या दारी पोहोचले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे,आत्माचे प्रकल्प संचालक मिसाळ, उपविभागीय कृषी अधिकारी भागवत सरडे, रेशीम विकास अधिकारी वाकुरे, तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे व सुमित सोनटक्के आदी अधिकाऱ्यांनी आपल्या संपूर्ण तांत्रिक पथकासह परिसंवादास उपस्थित राहून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. केळी लागवड परिसंवादात व्यवस्थापन तज्ज्ञ सोमनाथ हुलगे, किरण डोके,किरण चव्हाण, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.अरुण गुट्टे, यांनी मार्गदर्शन केले. यानंतर मान्यवरांनी थेट शेतात जाऊन रणनवरे यांच्या तुती लागवडीला व मोरे, गणेश नेटके यांच्या केळी लागवडीला व गणेश बँक सेवा केंद्रालाही भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर शरद नवले यांनी केले. तर आभार सहाय्यक कृषी अधिकारी रेशमा कामटे यांनी मानले.
