भूम (प्रतिनिधी)- भूम शहरातील कसबा विभागातील पुरातन सिद्धनाथ महाराजांच्या मंदिराचे बांधकाम 1757 नंतर पुढील सभागृहाचे बांधकाम 2024-25 मध्ये नगरपरिषदच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून पूर्ण होत आहे. या भागातील नागरिकांची सिद्धनाथ मंदिरासमोरील जुने पत्र्याचे सभागृह नादुरुस्त होते. त्या ठिकाणी नवीन सभागृह करावे. अशी या भागातील नागरिकांची मागणी होती. त्यानुसार माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी माजी मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे पाठपुरावा करून वैशिष्टय पूर्ण योजनेमधून या मंदिरासाठी निधी मंजूर करून आणला.

व मंदिराचे 70 ते 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. या सिद्धनाथ महाराजाच्या मंदिरामध्ये समोरील भिंतीवर दोन शिलालेख आढळले आहेत. या शिलालेखावर इ.स. 1757 सालचे असल्याचे स्पष्ट दिसत आहे. शिलालेखाची भाषा मराठी व लिपी देवनागरी आहे. उजव्या भिंतीवरील वरील स्वरूपाचा लेख व डाव्या भिंतीवरील खोदीव लेख या दोन्हीवरील रेखाटलेला मजकूर एकसारखाच असला तरी दुसऱ्या शिलालेखात मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध पंचमी, वार व संवत्सवर याचा स्पष्ट उल्लेख आहे. या लेखांमधून भूम परगणा कसब्याचे मोकदम जानोजी निंबाळकर देशमुख देशपांडे व गोविंद खंडेराव देशमुख -देशपांडे यांनी सिद्धनाथ मंदिर बांधल्याचे समोर येत आहे .निंबाळकर घराण्याचा इतिहास व वंशावळीचा अभ्यास करण्यासाठी हा शोध महत्त्वाचा ठरत असून निजाम कालीन कारभारात या घराण्याचे राजकीय व प्रशासकीय महत्त्व अधोरेखित होते. तसेच मंदिर स्थापत्य व कला वैशिष्ट्य समजण्यासाठीही या शिलालेखांचा उपयोग होणार आहे. निंबाळकर घराण्याचा मूळ ठिकाणाजवळील म्हसवड (जि.सातारा) येथे सिद्धनाथाचे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर आहे. भूम येथेही असेच परंपरा जोपासली गेल्याचे या शिलालेखातून दिसून येते.


 
Top