धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील विविध विकास योजनांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी दिशा समितीची बैठक नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे मंगळवार, दि. 3 सप्टेंबर 2025 रोजी सांयकाळी संपन्न झाली. 7 तास चाललेल्या या बैठकीचे अध्यक्षस्थान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी भूषविले होते. यावेळी ओमराजे यांनी कामासंदर्भात आपल्याला का विचारले जात नाही, सांगितलेली कामे का केली जात नाहीत? तुम्ही जनतेचे नोकर आहात, तुम्हाला लाज वाटत नाही का असे कामे करायला, असे म्हणत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. विकासाची कामे वेळेत पूर्ण करून घ्या अन्यथा कंत्राटदाराना काळ्या यादीत टाका असे निर्देश पण खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हा नियोजन भवनात झालेल्या या बैठकीस कळंब-धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील, उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य, गृहनिर्माण आदी पायाभूत सुविधांच्या प्रगतीवर विशेष भर देण्यात आला.
बैठकीत जिल्ह्यात सुरू असलेल्या रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री आवास योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, ग्रामीण पाणीपुरवठा व विजपुरवठा योजना, वृद्धापकाळ, विधवा व अपंग पेन्शन योजना, स्वच्छ भारत अभियान तसेच अनुसूचित जाती-जमाती व इतर मागासवर्गीयांसाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष विकास योजना यांचा आढावा घेण्यात आला. सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या रेल्वे मार्गाचा बजेट 900 कोटी वरून 3 हजार कोटींवर कसे गेले. असा प्रश्न उपस्थित करून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी रेल्वे मार्गाचे काम व रस्त्याची कामे कधीपर्यत होतील ते लेखी कळवावे असे आदेश दिले. यावेळी कामगार अधिकारी उपस्थित नसल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याला जिल्हाधिकारी यांनी जाब विचारला. शहरातील स्वच्छता संदर्भात खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

