धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा स्वातंत्र्यसैनिक समिती संचलित श्री सिद्धेश्वर निवासी विद्यालय, वरवंटी येथे दिनांक 6 सप्टेंबर रोजी पालक-शिक्षक मेळावा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शाळा-पालक-शिक्षक यांच्यातील समन्वय वाढवणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देणे हा मेळाव्याचा मुख्य उद्देश होता.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब जाधव होते. मुख्याध्यापक महादेव कांबळे यांनी शिस्त, दर्जेदार शिक्षण, व्यक्तिमत्व विकास व मूल्यांची रुजवणूक याबाबत मार्गदर्शन केले. तर शितल झिंगाडे यांनी गणवेश, उपस्थिती व शालेय उपक्रमांची माहिती पालकांना दिली. यावेळी अण्णासाहेब जाधव यांनी पालक व विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दहावीतील विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घेऊन शाळेचे नाव उज्ज्वल करावे, तसेच शिक्षकांनी स्वाध्यायावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.
मेळाव्यात पालक प्रतिनिधी रवी देशमुख, परमेश्वर बेद्रे, शहाजी जाधव, सौ. उमा जाधव, श्रीहरी देशमुख, सागर पंडित, आबा सरपाळे आदी मान्यवरांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरज कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन बिरुमल चौरे यांनी केले. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी शिक्षक मदन गिरी, तारकेश अंबुरे, गाडेकर मॅडम, शंकर ओव्हाळ, विलास खरात, विश्वजीत देशमुख यांनी परिश्रम घेतले. पालकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे हा मेळावा विशेषतः यशस्वी ठरला.