तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर नगर परिषदेमार्फत वैशिष्ट्यपूर्ण योजना सन 2024-25 अंतर्गत एकूण 23 विकासकामे सुरू असून या कामांमध्ये नियम व अटींचे उल्लंघन करून बोगस व निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडी व घटक पक्षांनी केला आहे.
महाविकास आघाडीच्या प्रतिनिधी मंडळाने दिनांक 3 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी धाराशिव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर कामे ई-निविदा अ.क्र. 15 नुसार आरएमसी प्लांटद्वारेच करावयाची अट होती. मात्र, प्रत्यक्षात आरएमसी प्लांट न वापरता हातपलटीवरून कामे करण्यात येत असून दगड मिक्स, दगडाचा चुरा, कमी सिमेंट वापरून काम सुरू आहे. यामुळे कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असून निविदेतील अटींचे उल्लंघन झाले आहे.
तसेच गुत्तेदार संजय अण्णाप्पा पवार व यांना काळ्या यादीत टाकून कामकाज त्वरित थांबवावे, कामाचा करार रद्द करावा व देयके रोखावीत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. या प्रकरणात योग्य ती कारवाई न झाल्यास महाविकास आघाडी व घटक पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदनावर अमोल कुतवळ, रणजीत इंगळे, आनंद जगताप, शरद जगदाळे, सुधीर कदम, राहुल खपले, तोफिक शेख, श्याम पवार, ऋषिकेश मगर, अमर चोपदार, अक्षय कदम, भरत जाधव, उत्तम अमृतराव, किरण यादव, बालाजी तट, बाळासाहेब कदम, नवनाथ जगताप, अण्णासाहेब मगर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.