वाशी (प्रतिनिधी)- तालुक्यातील खामकरवाडी येथे दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशीच्या मुला-मुलींनी शानदार कामगिरी करून आपले वर्चस्व सिद्ध केले.
19 वर्षाखालील मुलांच्या संघाने ज्ञान प्रबोधिनी गुरुकुल विद्यालय, खामकरवाडी या बलाढ्य संघावर तब्बल 25 गुणांनी दणदणीत विजय मिळवला. तर मुलींच्या संघानेही उत्कृष्ट खेळ करत जनता विद्यालय, मांडवा यांचा केवळ 5 गुणांनी पराभव करून स्पर्धेतील विजेतेपद पटकावले.
यशाची परंपरा कायम ठेवत महाविद्यालयाने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला असून, पुढे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघाची निवड झाली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. कदम यांनी विजयी संघाचे अभिनंदन करून, “हा विजय हा विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा उत्तम परिपाक आहे,” अशा शब्दांत गौरव केला. या यशामागे क्रीडा शिक्षक सरवदे एस. एस. यांचे अथक परिश्रम तसेच प्रा. डॉ. रविंद्र चव्हाण सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.