लोहारा (प्रतिनिधी)- गोवंश हत्या बंदी सुधारीत कायदा 2015 मध्ये तत्काळ दुरुस्ती करावी, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी, कुरेशी व व्यापारी समाजाने संयुक्तरित्या मंगळवारी (ता. 2) तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी साडेअकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मोर्चास प्रारंभ झाला. महात्मा फुले चौक, डॉ. आंबेडकर चौक, आझाद चौक, जगदंबा मंदिर मार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. या मोर्चात तालुक्यातील शेतकरी, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तहसीदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, 2015 पासून राज्यात गोवंश हत्या बंदी लागू झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या भाकड जनावरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. या जनावरांच्या खरेदी-विक्रीतून कुरेशी व व्यापारी समाजाचा परंपरागत उदरनिर्वाह सुरू असतो; परंतु गोरक्षकांच्या नावाखाली राज्यभर गुंडांची टोळी सक्रिय आहे. जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवणे, मारहाण करणे, लूटमार करण्याचे प्रकार केले जात आहेत. यामुळे मागील दोन महिन्यांपासून जनावरांची खरेदी-विक्रीचा व्यवहार थांबविण्यात आला आहे. परिणामी शेतकर्य़ांच्या भाकड जणावरांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गोवंश हत्या बंदीच्या नावाखाली गोरक्षकांनी शेतकरी, व्यापारर्य़ांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळे गोवंश हत्या बंदी कायद्यामध्ये शिथीलता आणावी, कथीत गोरक्ष टोळ्यांवर कार्यवाही करावी, शेतकर्य़ांचे कर्जमाफ करण्याचे निवेदन तहसील प्रशासनाला दिले. यावेळी सलीम कुरेशी, जाकीर कुरेशी, बाळासाहेब पाटील, अमीन कुरेशी, भातागळीचे उपसरपंच हणमंत जगताप, रविकिरण बनसोडे, अभिमान खराडे, शब्बीर गवंडी, उपनगराध्यक्ष अमीन सुंबेकर, श्रीकांत भरारे, मल्लिनाथ घोंगडे, बसवराज पाटील, रौफ बागवान, विजयकुमार ढगे, आरिफ खानापुरे, उत्तम भालेराव, महेबूब गवंडी, पप्पू स्वामी, खुनमीर मोमीन यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
