तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास 22 सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून आज, शुक्रवार दि. 26 सप्टेंबर रोजी (पाचव्या माळेच्या दिवशी) ललिता पंचमी निमित्त देविजींचा सिंहासनावर रथ अलंकार महापूजा मांडण्यात आली होती. आज पावसाचा संततधारेत भाविकांनी दर्शन घेतले.
रथअलंकार पुजा मांडण्या बाबतीत अशी आख्यायिका मांडली जाते की, भगवान सुर्यनारायणांनी त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ श्री तुळजाभवानी मातेस दिला होता. या परंपरेच्या स्मरणार्थ रथ अलंकार अवतार पूजेला शारदीय नवरात्रात खास महत्त्व आहे. भाविकांनी दिवसभर रांगेत उभे राहून देवीच्या या अलंकार दर्शनाचा लाभ घेतला.
गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी चौथ्या माळेच्या दिवशी मोरवाहनावरून श्री तुळजाभवानी देवींची पारंपरिक छबिना मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकांची मोठी उपस्थिती लाभली. शारदीय नवरात्र उत्सवाच्या उर्वरित दिवसांत दररोज वेगवेगळ्या वाहनांवरून देवीची छबिना मिरवणूक निघणार आहे. भाविकांना या सोहळ्याचे दर्शन घेता यावे यासाठी मंदिर संस्थानकडून सुरक्षा, पाणी, निवारा व महाप्रसादाच्या व्यवस्थांची विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. एकंदरीत, श्रद्धा, भक्तिभाव आणि परंपरेची नाळ जपणारा हा शारदीय उत्सव भाविकांसाठी दररोज नवा धार्मिक अनुभव देतो आहे.