तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या नगरीत, तब्बल तेरा वर्षांनंतर शहरवासीयांच्या मागणीनुसार सांस्कृतिक महोत्सवाची पुनश्च सुरूवात झाली आहे. नवरात्राच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला हा महोत्सव भाविकांसाठी आनंदाचा ठेवा ठरत असतानाच काही जणांकडून अनावश्यक विरोध होत आहे.
दरम्यान, या विरोधावर स्थानिक नागरिक व भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे..“राज्यात सर्वत्र नवरात्र सांस्कृतिक कार्यक्रम होत असताना फक्त तुळजापूर महोत्सवाला विरोध का?” असा सवाल करुन यात धागडधिंगा करणारे कार्यक्रम नाहीत तर धार्मिक कार्यक्रम होत आहेत. महोत्सवाच्या आयोजनात स्थानिक नागरिक, भाविक, सामाजिक संस्था सक्रियपणे सहभागी झाले आहेत. मंदीर परिसरापासून शहरात विविध धार्मिक-सांस्कृतिक उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भाविकांचा ठाम विश्वास आहे की, हा उत्सव हा शहराचा अभिमान असून, आई भवानीच्या नगरीतील श्रद्धा आणि भक्तीचे दर्शन घडवणारा सोहळा आहे.
अतिवृष्टीमुळे विरोध
जिल्ह्यात 42 महसूल मंडळात अतिवृष्टी होवून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्हाधिकारी हे सरकारचे प्रतिनिधी असतात. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे घर, जमीन, पशुधन सर्व काही वाहून गेले. तुळजापूर येथील सांस्कृतिक महोत्सवामध्ये जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी यांनी भाग घेवून असंवेधनशीलपणे नाचत असल्याचे दिसत आहेत. जिल्ह्यातील शेतकरी रडत असताना अशा प्रकारचा विरोधाभास योग्य नाही. खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी सांस्कृतिक महोत्सवाचा निधी अतिवृष्टीमधील संकटग्रस्त शेतकऱ्यांना द्या अशी मागणी करून शेतकऱ्यांना कशा प्रकारे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळेल यासाठी आपला पूर्ण वेळ प्रशासनाने द्यावा अशी मागणी केली आहे.