धाराशिव (प्रतिनिधी)-   मराठवाडा मुक्ती संग्रामात धाराशिव जिल्ह्यामध्ये उपळा (मा.) गावचे विशेष योगदान आहे.या गावातील स्वातंत्र्य सैनिकांनी  मराठवाडा मुक्ती संग्रामात सक्रीय सहभाग घेतला.त्या सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या वर्धापन दिनी अभिवादन करतो,असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.उपळा गावातील तरूणांच्या मागणीनुसार स्मृती स्तंभाजवळ लवकरच स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र सुरू करण्यात येईल,अशी ग्वाही देत जिल्हा प्रशासनाने याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही पालकमंत्री सरनाईक यांनी केल्या.

धाराशिव तालुक्यातील उपळा (मा.) येथे रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामस्तरीय ग्रामसभा शुभारंभ कार्यक्रम पार पडला. यावेळी पालकमंत्री सरनाईक बोलत होते.याप्रसंगी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, जिल्हा पोलिस अधीक्षक रितू खोखर, उपळ्याचे सरपंच सुहास घोगरे, उपसरपंच विकास पडवळ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार,  आदींसह सर्व ग्रामस्थांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

अभियानाअंतर्गत गावचा विकास करण्यावर शासनाचा अधिकभर असणार आहे. अभियानांतर्गत सुशासन पंचायत, गावपातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण, लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे,जल समृद्ध,स्वच्छ व हरित गाव,मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण,सक्षम पंचायत, उपजीविका विकास,सामाजिक न्याय ही अभियानाची मुख्य घटक असून यातून सशक्त पंचायत आणि समृद्ध महाराष्ट्र घडण्यास मदत होणार असल्याचेही पालकमंत्री सरनाईक यांनी सांगितले.

सुरूवातीला गावातील स्मृती स्तंभ येथे पालकमंत्री सरनाईक यांनी पुष्पचक्र अर्पण करून स्वातंत्र्य सैनिकांना वंदन केले. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. पालकमंत्री सरनाईक यांचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी स्वागत केले.

 
Top