धाराशिव (प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे सेवा पंधरवडा राबवण्यात येणार आहे. याअंतर्गत पाणदरस्ते मोकळे करणे, मंजूर घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून देणे, आदी उपक्रम राबवले जाणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशनचे उपाध्यक्ष, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर रोजी साजरा झाला. यानिमित्त सेवा पंधरवडा राबवणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले आहे. या सेवा पंधरवड्यात धाराशिव जिल्ह्यासह राज्यभरात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. याबाबतची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

पाणंदरस्ते मोकळे करण्यात येणार आहेत. राज्यभरात हजारो किलोमीटरच्या पाणंदरस्त्यांची कामे केली जाणार आहेत. या कामांत काही अडचणी आल्या तर त्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.  जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वच जण पूर्ण क्षमतेने हे काम करणार आहेत. या सेवा पंधरवड्यात पहिल्या पाच दिवसांत पाणदरस्त्यांची कामे हाती घेतली जाणार आहेत, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

त्यानंतरच्या पाच दिवसांत मंजूर घरकुलांच्या कामांकडे लक्ष दिले जाणार आहे. मंजूर झालेल्या घरकुलांना जागा उपलब्ध करून देणे, 2011 च्या आधीचे पुरावे असलेल्या सर्वांनाच गावठाणात किंवा गायरानात जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यानंतर आरोग्यसेवा, स्वच्छता आदी उपक्रम राबवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


रेल्वेच्या कामाला गती, धाराशिवला जंक्शन होणार

धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये घोषणा केली होती. आता हे काम धडाक्यात सुरू आहे. धाराशिवला रेल्वेचे जंक्शन केले जाणार आहे. हा रेल्वेमार्ग कार्यान्वित झाल्यानंतर अर्थकारणाला मोठी गती मिळणार असून, त्यामुळे जिल्ह्याचा कायापालट होणार आहे. पंतप्रधान मोदी साहेबांनी आपल्या जिल्ह्यासह राज्यातील विकासकामांसाठी मोठे सहकार्य केले आहे. मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशात, राज्यात विकासाची घोडदोड सुरू आहे. त्यात आपण कुठेही मागे राहू नये, यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

 
Top