वाशी (प्रतिनिधी)- “भाषा ही संस्कृतीची शान आणि एकतेचे बंधन असते”, या विचारांचा प्रत्यय वाशी येथील अंकुरम विद्यामंदिरात आला, जेव्हा 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस दिमाखात आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मंगलप्रार्थना व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. अरुण गंभीरे, प्रा. अशोक पाटील, प्रा. नवनाथ झेंडे आणि प्रा. लक्ष्मण धावारे उपस्थित होते. शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वरमधुर स्वागतगीत गाऊन मान्यवरांचे स्वागत केले आणि कार्यक्रमाला एक सुंदर प्रारंभ मिळवून दिला.
यानंतर विद्यार्थ्यांच्या साहित्यिक प्रतिभेचे प्रतीक ठरलेले “हिंदी का अंकुर” या स्वरचित कथा व कविता संग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच शाळेच्या हिंदी विभागाच्या भव्य दालनाचे उद्घाटन करण्यात आले. या क्षणाने विद्यार्थ्यांमध्ये आनंद, अभिमान आणि प्रेरणा ओसंडून वाहताना दिसली.
प्रा. अशोक पाटील यांनी रसाळ हिंदी शायरी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी हिंदी भाषेचे राष्ट्रीय एकात्मतेतील योगदान आणि जगभरातील महत्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांना हिंदीबद्दल प्रेम जोपासण्याचे आवाहन केले. त्यानंतर प्रा. डॉ. अरुण गंभीरे यांनी आपल्या प्रभावी मार्गदर्शनातून संविधानिक महत्त्व, राष्ट्रभक्ती व राष्ट्रनीतीमधील हिंदीचे स्थान अधोरेखित केले. त्यांच्या शब्दांनी विद्यार्थ्यांच्या मनात हिंदी ही केवळ भाषा नसून संस्कृतीचे आणि ऐक्याचे प्रतीक आहे हा ठसा उमटवला. यावेळी प्राचार्य सोमनाथ स्वामी यांचे भाषण झाले. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन सहशिक्षिका सोनल जैन व शिला क्षिरसागर यांनी केले. संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनोद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक श्रराजेश आवटे, पर्यवेक्षक मीनाक्षी जाधव, समन्वयक आतकरे, पूजा सावंत तसेच सर्व शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.