धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यात गेल्या काही दिवसांपासून बहुतांश भागात अतिवृष्टी होत आहे. जिल्ह्यातील काही भागात कधी नव्हे तो इतका पाऊस 21 सप्टेंबरच्या रात्री झाला आहे.शेतकऱ्यांच्या विविध पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.अशाप्रसंगी अडचणीत सापडलेल्या माणसाला उभे करण्याचे काम करण्यात येईल.अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी दिली.
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील देवगाव(खुर्द) येथे 31 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेतपिकांचे झालेल्या नुकसानीची आणि नदीवरील क्षतीग्रस्त पुलाची पाहणी केली.त्यानंतर गावातील चौकात उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधताना श्री.पवार बोलत होते. यावेळी आमदार विक्रम काळे,माजी आमदार राहुल मोटे,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पवार यावेळी म्हणाले की, पुरामुळे घरात अडकून पडलेल्या काही नागरिकांना एनडीआरएफ आणि सैन्याच्या मदतीने प्रसंगी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून काढण्यात आले.अनेकांचे पाळीव जनावरे व कोंबड्या मृत्युमुखी पडल्या.हवामान खात्याने पुन्हा पुढील चार-पाच दिवसात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
पिकांचे व क्षतीग्रस्त घरांचे पंचनामे लवकरच करण्यात येतील असे सांगून श्री.पवार पुढे म्हणाले की, कोणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही.दिवाळीच्या आधी नुकसानीची रक्कम शेतकरी व नागरिकांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.आपण सर्व एक परिवार आहोत. परिवारातील सदस्यांची काळजी घेणे ही आमची जबाबदारी आहे शाळा, ग्रामपंचायती व पिण्याच्या पाण्याच्या योजना पुराच्या पाण्यात आहे.वीज वितरण कंपनीने आपले विद्युत खांब,तार तसेच डीपी दुरुस्तीची तातडीने हाती घ्यावीत. नागरिकांनी या परिस्थितीत खचून जावू नये.राज्य सरकार आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याची ग्वाही यावेळी श्री. पवार यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिली. यावेळी पुरबाधित ग्रामस्थांनी श्री. पवार यांना निवेदन देऊन चर्चा केली.