धाराशिव (प्रतिनिधी)- “अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीत शेतकऱ्यांचा कसूर नाही.शासन तातडीने नोंद घेऊन सर्वांना मदत करणारच,” असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.आज ते भूम तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आले होते.
चिंचोली येथे नगररोडलगतच्या शेडमध्ये झालेल्या दुर्घटनेची माहिती त्यांनी घेतली.या दुर्घटनेत राहत्या शेडमध्ये पाणी शिरल्याने कै.देवनाबाई नवनाथ वारे यांचा मृत्यू झाला होता.श्री.पवार यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आणि शासनामार्फत 4 लाख रुपयांचा मदतीचा धनादेश सुपूर्द केला. यानंतर चुबळी गोरमाळा येथील फुटलेल्या पाझर तलावामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली.तसेच वालवड व पाटसांगवी येथील फुटलेले तलावही त्यांनी पाहिले.यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून “कोणत्याही शेतकऱ्याला नुकसानभरपाईपासून वगळले जाणार नाही,” असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले.
तहसीलदार जयवंत पाटील यांना तात्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.पिके,जमीन, विहिरी,पशुधन तसेच जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान लवकरात लवकर भरून निघावे यासाठी ते प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.“रेकॉर्ड जितक्या लवकर मिळतील तितक्या लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा केली जाईल,” असे ते म्हणाले. दरम्यान, शेतकऱ्यांनी पूल दुरुस्ती व तातडीची मदत जाहीर करण्याच्या मागण्या केल्या.यावेळी आमदार विक्रम काळे,माजी आमदार राहुल मोटे,महेंद्र धायगुडे, सुरेश बिराजदार,रणजित मोटे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.