धाराशिव  (प्रतिनिधी)- “सगळं काही वाहून गेलं आहे,फक्त आत्महत्या करणं बाकी राहिलंय” अशा शब्दांत साडेसांगवी (ता.भूम) येथील पुरग्रस्त शेतकरी ज्ञानेश्वर डोंबाळे यांनी आपली व्यथा  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली.

उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी आज साडेसांगवी गावाला भेट देऊन अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीची पाहणी केली.यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने मदत सुरू करा” अशा स्पष्ट सूचना दिल्या.गावातील 150 कुटुंबांना तातडीने किराणा किट वाटप करण्यात आले.

ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्याकडे बाणगंगा व रामगंगा नदीवर मोठा पूल बांधण्याची,तसेच घर व शेतीचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.श्री.शिंदे यांनी या मागण्यांवर बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले.यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते आपत्तीग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू,ब्लँकेट्स व किराणा किटचे वाटप करण्यात आले.

या दौऱ्यात आमदार तानाजी सावंत, माजी आमदार ज्ञानराज चौगुले,  जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक रितू खोखर,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महादेव आसलकर यांच्यासह जलसंपदा, कृषी,पाटबंधारे व आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top