तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या कृपेने पुणीत झालेल्या तुळजापूर नगरीत अनेक देवस्थाने असून, त्यातीलच एक वैशिष्ट्यपूर्ण आणि अतिप्राचीन मंदिर म्हणजे आडातील गणपती होय.
‘नवसाला पावणारा आडातील गणपती' म्हणून प्रसिद्ध असलेल्या या देवस्थानाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे मूर्तीचे दर्शन फक्त पाण्यातून घेतले जाते. आडात स्वच्छ पाणी असेल तर गणेशाची शेंदूरलाल मूर्तीचे प्रतिबिंब स्पष्ट दिसते आणि भाविकांना दिव्य आनंदाचा अनुभव मिळतो.
यंदाच्या गणेशोत्सवात झालेल्या प्रचंड पावसामुळे आडात भरपूर पाणी साठले असून सध्या अर्धी मूर्ती पाण्यात असल्याने दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. हे मंदीर पुरातन असुन शेकडो वर्षांपूर्वी प्राणप्रतिष्ठा झाल्याचे सांगितले जाते.मंदिरात प्रवेशासाठी 20-25 पायऱ्या उतराव्या लागतात.अखंड दिव्याचा प्रकाश टिकावा म्हणून वर छत नसलेली रचना.आडाच्या दगडी देव्हाऱ्यात दोन फूट उंच व एक फूट रुंदीची मूर्ती.मंदिराचे बांधकाम गणेश यंत्र रचनेवर आधारित.
संकष्टी, अंगारकी, गणेश जन्मोत्सव आणि गणेशोत्सवाच्या काळात येथे विशेष अभिषेक-पूजा केली जाते. आडातील गणपतीचे हे अनोखे देवस्थान तुळजापूरच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाला जपणारे एक अद्वितीय स्थळ ठरले आहे. पाण्यातील गणेश दर्शनाचा अनुभव घेण्यासाठी भाविकांची ओढ वाढतच चालली आहे.
