धाराशिव (प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदी-नाल्यांचे पाणी गावांमध्ये पाणी शिरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे जीवनोपयोगी साहित्यांसह शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या प्रशासन आणि एनडीआरएफच्या पथकांकडून पूरग्रस्त भागात मदत व बचावकार्य जलदगतीने सुरू आहे. अशा कठीण परिस्थितीत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे पूरग्रस्त भागातील मदत कार्यात सहभागी झाले आहेत. कोसळणाऱ्या पावसात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता, ते एनडीआरएफच्या जवानांसोबत मदतकार्यात गुंतलेले पाहायला मिळाले.
शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची मागणी
परंडा तालुक्यातील वडनेर येथील एका घरात अडकलेल्या 4 सदस्यांच्या कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर स्वतः पाण्यात उतरले. मध्यरात्री 2 वाजल्यापासून घरात अडकलेल्या या कुटुंबाला वाचवताना एनडीआरएफच्या बोटीला अडचण आली. त्यावेळी गावकऱ्यांच्या मदतीने खासदार निंबाळकर यांनी छातीपर्यंत वाहणाऱ्या पाण्यात उतरून चारही जणांना बाहेर काढले व सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. “ही परिस्थिती माझ्या कुटुंबावर आली असती तरी मी घरात बसलो नसतो“, अशी भावना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बोलून दाखवली. सोबतच त्यांनी शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे. 22 सप्टेंबरच्या रात्री आमदार कैलास पाटील यांनी रात्री कळंब तालुक्यात मलकापूर, येरमाळा, आथर्डी, खोंदला या भागात 23 सप्टेंबरच्या पहाटेपर्यंत थांबून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची व्यवस्था केली.
नदीकाठच्या गावांमध्ये भीषण परिस्थिती
सिना कोळेगाव प्रकल्पातून 70 हजार क्यूसेक, खासापुरी प्रकल्पातून 44 हजार 655 क्यूसेक आणि चांदणी प्रकल्पातून 31 हजार 561 क्यूसेक विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
300 नागरिकांचे रेस्क्यू ऑपरेशन
परंडा तालुक्यात रविवारी व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे चांदणी, उल्का व उल्फा नद्यांना महापूर आला. रुई, दुधी, ढगपिंपरी, देवगाव (खु.), वडनेर आदी गावांमध्ये 250 ते 300 नागरिक अडकले होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक, आर्मी, एनडीआरएफ व हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. रुई येथे 13 आदिवासी, लाखी येथे 12, ढगपिंपरी येथे 8 आणि वडनेर परिसरातील 35 जणांना विशेष मोहीम राबवून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.