धाराशिव (प्रतिनिधी)- ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. तर कधी ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळे शेतीची दैनीय अवस्था झाली आहे. ग्रामीण भागात अनेक घरात पाणी शिरले. तर अनेकांच्या शेतातील पिके पाण्याखाली गेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 42 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली जात आहे.
ऑगस्ट महिन्यात धाराशिव जिल्ह्यातील 23 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली होती. 2 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. सप्टेंबरमध्येही धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील 7 मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. परंतु जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. अनेक शेताला तळाचे स्वरूप आले आहे. या पावसाचा तडाखा हजारो हेक्टर पिकांना बसला आहे. त्यामुळे सोयाबीन, उडीद, मुग या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पंचनामे सुरू
धाराशिव जिल्ह्यात ऑगस्टमध्ये 2 हेक्टर पिकांचा नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला होता. एखाद्या सर्कलमध्ये 65 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडल्यानंतरच अतिवृष्टीची नोंद होते. व पंचनामा करण्यात येतो. जिल्ह्यात सध्या 42 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे शासकीय अध्यादेशानुसार पंचनामे सुरू आहेत. अनेक गावातील पावसाची नोंद योग्य येत नसल्यामुळे पर्जन्यमापक यंत्र 90 टक्के ग्रामपंचातय कार्यालयात बसविण्याचे काम सुरू आहे. 10 टक्के ग्रामपंचायतच्या जागेबाबत तालुकास्तवरील तहसीलदार निर्णय घेवून पर्जन्यमापक यंत्र बसवतील.
महादेव असलकर, प्रभारी कृषी अधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव