भूम (प्रतिनिधी)- दारूबंदी भागातील भूम शहरात पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 28 हजार रुपये किमतीची हातभट्टी दारू जप्त करून नष्ट केली. या प्रकरणी महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांत सुरज लघु पवार, संगीता रामा काके, ताई अंकुश पवार व हिरा कल्यान पवार यांचा समावेश आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोष्टी गल्ली, भूम येथे राहणारी आरोपी महिला आपल्या राहत्या घरासमोर विनापरवाना बेकायदेशीररित्या हातभट्टी दारू जवळ बाळगून चोरटा विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने ती ठेवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. यावेळी आंबट उग्रवास येत असलेली हातभट्टी दारू मिळून आली. कारवाईदरम्यान पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे, पोलीस उपनिरीक्षक संजय झाराड, प्रल्हाद सरोदे, कॉन्स्टेबल अजित कवडे, लक्ष्मान शिंदे, देवकर तसेच महिला कर्मचारी उपस्थित होते. या प्रकरणी म.दा.का. कलम 65(ई) व 65(फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोह. 1364 शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.


 
Top