उमरगा (प्रतिनिधी)-  आमदार प्रवीण स्वामी यांनी राष्ट्रीय महामार्ग मुंबई- हैद्राबादची पाहणी करून महामार्गावरील विविध समस्यांबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक स्वप्नील कासार यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी आमदार स्वामी यांनी उमरगा शहरातील बायपास, कोरेगाव येथील अंडरपासमध्ये साचलेले पाणी, महामार्गावरील पथदिवे (हायमास्ट), रॅम्बलर पट्ट्या (रॅम्बलर), साईड पट्टे, झेब्रा क्रॉसिंग, तसेच पावसामुळे जागोजागी पडलेल्या खड्ड्यांसारख्या समस्यांकडे लक्ष वेधले. या सर्व कामांची तातडीने दुरुस्ती करून ती योग्य स्थितीत आणण्याचे निर्देश त्यांनी दिले. यासोबतच, महामार्गासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत, त्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. या प्रकरणी प्रकल्प संचालक कासार यांनी ठोस भूमिका घेऊन शेतकऱ्यांना लवकरात लवकर मोबदला मिळवून द्यावा, अशा सूचनाही आमदार स्वामी यांनी दिल्या.  


रस्त्याच्या कामामुळे पावसाचे पाणी शेतात

राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडकल्याने महामार्गालगतच्या शेकडो एकर शेतीत पावसाचे पाणी साचले आहे. यामुळे पिके पाण्याखाली गेली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य मार्ग काढून देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. त्यातच, महामार्ग क्र. 65 च्या कामामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला असून अनेक ठिकाणी पाण्याचा योग्य निचरा होत नाहीये. याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसला असून, महामार्गालगतच्या शेकडो एकर शेतात पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले आहे. यामुळे सोयाबीन, मूग, उडीद यांसारख्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेली पिके पाण्याखाली असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी करत आहेत. अन्यथा, मोठे नुकसान झाल्याने त्यांना शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी करावी लागेल असेही ते म्हणाले.

 
Top