नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात दि. 29 ऑगस्ट रोजी पतसंस्थेच्या कारणावरून दोन प्राध्यापकांमध्ये भांडण झाले. यावेळी या प्राध्यापकांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करत एकमेकांची गचांडी धरली. प्राध्यापकांचा हा तमाशा विद्यार्थ्यांसमोर सुरु होता.अशा अश्लील भाषेत महाविद्यालयात विद्यार्थ्यांसमोर शिवीगाळ करणाऱ्या प्राध्यापकांवर बालाघाट शिक्षण संस्था कारवाई करणार का? 

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्था संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आहे. बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हे काँग्रेसचे जेष्ठ नेते राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे आहेत. या महाविद्यालयात नळदुर्ग शहर व ग्रामिण भागातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दि. 29 ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते साडे दहा वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयामध्ये पतसंस्थेच्या कारणावरून विद्यार्थ्यांसमोर दोन प्राध्यापकांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यावेळी या दोन्ही प्राध्यापकांनी अतिशय खालच्या पातळीवर एकमेकांना शिवीगाळ करत एकमेकांची गचांडी धरली. या प्राध्यपाकांचा हा तमाशा विद्यार्थ्यांसमोर सुरु होता. सध्या महाविद्यालयात पदवीच्या परीक्षा सुरु आहेत. त्यामुळे विद्यार्थी मोठया संख्येने महाविद्यालयात उपस्थित होते. त्यांच्यासमोर या प्राध्यापकांनी हे निंदनीय कृत्य केले असुन विद्यार्थ्यांसमोर अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या या प्राध्यापकांचा विद्यार्थ्यांनी काय आदर्श घ्यावे? या घटनेबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांना विचारले असता त्यांनी विद्यार्थ्यांसमोर अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. या घटनेचा पालकांनी जाहीर निषेध केला आहे. 

 
Top