वाशी (प्रतिनिधी)- तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, हाता तोंडाशी आलेली पीकं पूर्णपणे नष्ट झाली आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन देत, ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरीत मदत देण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.

कृषीमंत्री दत्ता भरणे हे शनिवारी वाशी शहरातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी आले होते. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना निवेदन सादर केले. निवेदनात  तालुक्यात तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. ओला दुष्काळ जाहीर करून थकीत किंवा चालू थकबाकीदार असा भेदभाव न करता सरसकट कर्जमाफी द्यावी. शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे. शेतकऱ्यांची होल्ड खाती तत्काळ काढावीत. अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर तालुकाध्यक्ष वसंत जगताप, गजानन भारती, सचिव संजय कवडे, पांडुरंग घुले, शहाजी कागदे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या सह्या असून, संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचे याकडे लक्ष लागून आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्यांच्या अडचणी सरकारने गांभीर्याने घेऊन त्वरित मदत करावी, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने यावेळी दिला आहे.

 
Top