धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील आर्य चाणक्य माध्यमिक विद्यालयात श्री संत ज्ञानेश्वर यांच्या 750 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन कार्यावर आधारित विविध वेशभूषा करून जीवनपटाचे विविध प्रसंगांद्वारे विद्यार्थी विद्यार्थिनींनी सादरीकरण केले. यामुळे प्रशालेतील वातावरण भक्तिमय होऊन संत ज्ञानेश्वरांच्या जीवनातील अनेक प्रसंगांची माहिती सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींपर्यंत पोहोचली.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आर्य चाणक्य माध्यमिक विद्यालयात ध्वजारोहण संपन्न झाले.त्यानंतर कै. प्रमोद महाजन सभागृहात कृष्ण जन्माष्टमी आणि श्री संत ज्ञानेश्वर यांच्या 750 व्या जयंतीनिमित्त विद्यार्थी विद्यार्थिनींनी विविध वेशभूषा साकारून संत ज्ञानेश्वरांच्या जीवनातील अनेक प्रसंग तसेच श्रीकृष्णांच्या विविध वेशभूषा साकारून उपस्थितांची मने जिंकली. श्री संत ज्ञानेश्वरांच्या जीवनातील ताटी उघडा ज्ञानेश्वरा, चांगदेव उपदेश तसेच रेड्याच्या मुखी वेद वदवणे आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी हे प्रसंग देखावे यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी हुबेहूब सादर केले. यामुळे प्रशालेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी पालक यांच्यापर्यंत श्री संत ज्ञानेश्वरांच्या जीवनपटाचा आणि त्यांनी मागितलेल्या विश्वात्मक देवाच्या आराधनेच्या पसायदानाचा भावार्थ पोहोचवण्यात प्रशालेला यश आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेच्या सहशिक्षिका आशा धनंजय कुलकर्णी, सुनंदा देविदास पाठक,  बचाटे, गुरव, शिंदे या सहशिक्षीकांनी परिश्रम घेतले. त्यांना विद्यार्थी विद्यार्थिनी आणि इतर शिक्षकांनी मदत केली. सर्व शिक्षक आणि शिक्षकांच्या प्रयत्नातून आणि विद्यार्थ्यांच्या उत्साहातून साकारलेल्या या श्री संत ज्ञानेश्वरांच्या जीवनावरील सादरीकरणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 
Top