वाशी (प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकट ओढावले असून, उडीद, सोयाबीन, मका आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिकांवर रोगराईचा प्रादुर्भावही वाढल्याचे दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी वाशी तालुक्यातील बाधित भागांना भेट देऊन शेतातील परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व तातडीने मदत पोहोचविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. याशिवाय, शहरातील काही व्यापाऱ्यांच्या दुकानात पावसामुळे झालेल्या नुकसानीचीही त्यांनी पाहणी केली. व्यापाऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रशासनाला योग्य ती मदत व उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. कृषी मंत्री भरणे यांच्या या दौऱ्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये थोडासा दिलासा निर्माण झाला आहे.