उमरगा (प्रतिनिधी)- शहरातील मुन्शी प्लॉट येथील एका 23 वर्षीय बेपत्ता तरूणाचा बाह्य वळण जवळ आरती मंगल कार्यालयाजवळ संशयास्पद मृत्यू प्रकरणी नातेवाईकांनी दिलेल्या जबावानुसार पोलिसांनी शनिवारी (ता. नऊ) खुनाचा गुन्हा दाखल केला असुन, या प्रकरणी तीन संशयित महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या बाबतची माहिती अशी की, शहरातील मुन्शी प्लॉट येथील कालिदास शिंदे यांनी आपला मुलगा अभिषेक शिंदे हा 24 जुलैपासुन बेपत्ता असल्याची तक्रार 25 जुलैला सकाळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याच रात्री उशिरा पोलिसांना बाह्यवळण रस्त्यालगत आरती मंगल कार्यालयाजवळ नाल्यात अभिषेकचा मृतदेह आढळून आला होता. दरम्यान या प्रकरणी 26 जुलैला अभिषेक यांचे वडिल कालिदास शिंदे यांनी आपल्या मुलाचा घातपात झाला असून संशयितावर कारवाईची करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी प्रारंभी पोलिसांनी कालिदास शिंदे यांचा जबाब घेऊन आकस्मित मृत्यूची नोंद केली होती. तत्कालिन पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत भराटे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास होता. मात्र डॉक्टराच्या शवविच्छेदन अहवाल प्राप्त नसल्याने पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला होता. मात्र नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांनी या प्रकरणात लक्ष घालून फिर्यादी कालीदास शिंदे यांच्या जबाबानुसार गुन्हा दाखल केला असून, सरोजा चिकुंद्रे रा. एकोंडी रोड उमरगा, रेणु पवार रा. डिग्गी रोड उमरगा, अनिता जाधव रा. डिग्गीरोड उमरगा सर्वजण ह.मु. कालिका कला केंद्र येरमाळा (जि. धाराशिव) यांना ताब्यात घेतले आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत भराटे हे तपास करीत आहेत.