भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील हाडोग्री जवळील मन्मथ स्वामी धाम शिवखडा येथे श्रावण मासानिमित्त अखंड शिवनाम साप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावण मासातील प्रत्येक सोमवारी या ठिकाणी भाविक भक्तांची गर्दी होत आहे. 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान या सप्ताहामध्ये शिवजागर, शिव कीर्तनकार व ग्रंथराज परम रहस्य पारायण सोहळा आयोजित करण्यात येत आहे. शि.भ.प. अखिलेश स्वामी साकोळकर वसमत यांच्या सुश्राव्य शिव कीर्तनानंतर शिवनाम सप्ताहाची सांगता होणार आहे.
संत शिरोमणी मन्मत स्वामी यांनी ध्यानधारणा, तपोअनुष्ठान केलेल्या डोंगरदऱ्यांच्या कुशीत शिवखडा डोंगराच्या पायथ्याशी वंजारवाडी नदीच्या तीरावर शिवखडा मंदिर गेल्या साडेचारशे वर्षांपासून भाविकांचे आकर्षण ठरत आहे. विशेषतः श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी भाविकांची येथे मोठे गदीं होते. तालुक्यातील हरवले गावच्या दक्षिण बाजूस दीड किमी अंतरावर शिवखडा नावाचा मोठा डोंगर असून त्याच्या पायथ्याशी हे पूर्वाभिमुख मंदिर आहे.
या मंदिरात शिवलिंग असून याची प्राणप्रतिष्ठा संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांनी साडेचारशे वर्षांपूर्वी केली. त्यानंतर त्यांचे शिष्य बंडाप्पा स्वामी व त्यांच्या नंतर आता बापू बाळू स्वामी (हाडोग्री) हे परंपरेनुसार उत्सव पुजारी म्हणून काम पाहत आहेत. त्या काळापासून आजतागायत येथे दररोज पूजा तर माघ महिन्यात संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराजांचा जन्मोत्सव, धार्मिक कार्यक्रम, अन्नदान, चैत्र महिन्यात भंडारा व धार्मिक कार्यक्रम होतात. महाशिवरात्रीनिमित्त सप्ताहात अन्नदान केले जाते. दरवर्षी श्रावण महिन्यात अखंड शिवनाम सप्ताह विविध धार्मिक कार्यक्रम येथे होतात.