धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2024 व फेब्रुवारी 2025 ते जून 2025 या कालावधीतील अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांना त्वरीत देण्यात यावे. येत्या आठ दिवसात या दोन वर्षातील अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर देण्याबाबत तातडीने कार्यवाही करणेबाबत आदेशीत करावे. अन्यथा या विरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
दिलेल्या निवेदनात दुधगावकर यांनी म्हंटले की, धाराशिव जिल्ह्यामध्ये सप्टेबर-ऑक्टोबर 2024 मध्ये 80 हजार शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान अतिवृष्टीमुळे झाले होते. त्याबाबत आम्ही वेळवेळी पैसे मिळावेत म्हणून महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास आणून देऊनही अद्यापही ते अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही. त्याच प्रमाणे माहे एप्रिल, मे व जून 2025 या कालावधीमध्ये अतीवृष्टी, सततचा पाऊस व वादळीवारा यामुळे 11546 शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर शेती पिकाचे, फळझाडे व भाजीपाला याचे नुकसान झाले आहे. त्यासंदर्भातील सर्व कागदपत्र शासनाकडे जिल्ह्याच्या वतीने पाठऊनही दिलेली आहेत. फक्त निधी मंजूर झाल्याच्या बातम्या येत आहेत. परंतू प्रत्यक्षात आजपर्यंत अतिवृष्टीचे कुठलेही अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही. त्यासाठी येत्या आठ दिवसात 2024-2025 या दोन वर्षातील अतिवृष्टी नुकसानीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर देण्याबाबत तातडीने कार्यवाही करणेबाबत आदेशीत करावे, अन्यथा या विरोधात लोकशाही मागार्ने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगांवकर यांनी दिला आहे.