मुरूम (प्रतिनिधी)- येथील रोटरी क्लब मुरूम सिटीचे सदस्य तथा सहशिक्षक संतोष कांबळे यांच्या 50 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुरूम येथील जिल्हा परिषद शाळेतील गुणवंत, होतकरू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य व खाऊचे वाटप शुक्रवारी (ता.29) रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
वाढदिवस अभिष्टचिंतन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला तुपेरे होत्या. यावेळी रोटरीचे अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, सचिव कलाप्पा पाटील, रोटरीचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, वसंत वस्तीगृहाचे अधीक्षक महेंद्र कांबळे, प्रा. अण्णाराव कांबळे, प्रा. सहदेव गायकवाड, सेवानिवृत्त सहशिक्षक आनंद कांबळे, राहुल गायकवाड, निर्मलकुमार लिमये आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन प्रत्येकाने आपला वाढदिवस समाज उपयोगी उपक्रमातून साजरा करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी तुपेरे म्हणाल्या की, आमच्या जिल्हा परिषद शाळेत आपला वाढदिवस साजरा केल्याने निश्चितच विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल. आपण दिलेल्या शालेय साहित्यामुळे विद्यार्थी निश्चितच घडतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निर्मलकुमार लिमये यांनी मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना संतोष कांबळे म्हणाले की, माझा वाढदिवस हे केवळ औचित्य आहे. मी जिल्हा परिषद शाळेत शिकलो आणि या शाळेतच मला काही मदत करता आली याचे मला समाधान वाटते. आपल्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे मला अधिक काम करण्याची प्रेरणा मिळेल अशी भावना व्यक्त केली. साहित्य वाटपाच्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरियन राजकुमार वाकडे, रोटरीचे माजी सचिव सुनिल राठोड, शिवाजी गायकवाड, सुनिता मिरगाळे, मंगल कचले आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महेश मोटे यांनी केले. सूत्रसंचालन सहशिक्षक रूपचंद ख्याडे तर आभार कलाप्पा पाटील यांनी मानले. यावेळी बहुसंख्येने पालक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.