तुळजापूर (प्रतिनिधी)- शेतीतून समाधान मिळण्याऐवजी संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील तरुण शेतकरी योगेश काडगावकर याने ४० हजार रुपये खर्चून दोन एकर क्षेत्रात शेपू भाजीची लागवड केली होती. मात्र, बाजारात भाव न मिळाल्याने अखेर शुक्रवार, १ ऑगस्ट रोजी त्यांनी हताश होऊन या संपूर्ण शेपू भाजीवर रोटावेटर फिरवून पीक जमीनदोस्त केलं.
योगेश काडगावकर यांनी अतिशय मेहनतीने शेपू भाजीचं पीक घेतलं होतं. मात्र, बाजारात या भाजीसाठी कवडीमोलही भाव मिळत नव्हता. वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत बाजारभाव शून्य असल्याने शेपू विकण्यापेक्षा नष्ट करणं जास्त योग्य ठरेल, असा निर्णय त्यांनी घेतला. पीक नष्ट करताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले होते. शेतकऱ्यांच्या मेहनतीला बाजारात योग्य मोबदला मिळत नसल्याने ग्रामीण भागातील तरुण शेतकरी निराश होत आहेत, ही बाब अत्यंत गंभीर असून कृषी धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
