धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी, शासनाच्या बदल्यांच्या धोरणानुसार, एका विभागात 5 वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विभाग बदल्या करण्याचे आदेश तालुका स्तरावरील गट विकास अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र त्या आदेश गट विकास अधिकाऱ्यांनी अक्षरशः थेट केराची टोपली दाखवली असून, अद्यापही अनेक पंचायत समित्यांमध्ये विभाग बदल्या झालेल्या नाहीत.

शासनाचा स्पष्ट नियम आहे की, कोणताही कर्मचारी एका विभागात 5 वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत राहू शकत नाही. हा नियम केवळ जिल्हा परिषद मुख्यालयापुरता मर्यादित नसून, तालुका आणि पंचायत समिती स्तरावरील सर्व कार्यालयांना लागू होतो. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद स्तरावर विभाग बदल्यांची अंमलबजावणी करण्यात आली, मात्र पंचायत समित्यांमध्ये ती प्रक्रिया पूर्णतः ठप्प आहे.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नुकतीच जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीदरम्यान त्यांना तालुका स्तरावर अद्यापही विभाग बदल्या न झाल्याचे दिसून आले. यावर त्यांनी तातडीने बदल्या करण्याचे स्पष्ट निर्देश दिले, तरीही त्यावर कोणतीही हालचाल झालेली नाही. यामुळे गटविकास अधिकाऱ्यांकडून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश पाळले जात नसल्याचे चित्र उघड होत आहे. दरम्यान, पंचायत समितीतील अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच विभागात कार्यरत असून त्यांचा मुजोरीपणा वाढल्याचे दिसत आहे. काही कर्मचारी गटविकास अधिकाऱ्यांना आर्थिक मदत करून बदल्यांपासून वाचत असल्याची कुजबूज कर्मचारी वर्तुळात ऐकू येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद कार्यालयातील कर्मचारी प्रश्न उपस्थित करत आहेत की, “आमच्यावरच अन्याय का ? आमची बदल्या होतात, मग तालुका पातळीवरील कर्मचाऱ्यांच्या का नाही ?“ मुख्य कार्यकारी अधिकारी हे कार्यतत्पर आणि स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी असल्याने आता तरी गटविकास अधिकाऱ्यांची कानउघडणी करून तालुका स्तरावरील विभाग बदल्यांची तात्काळ अंमलबजावणी होती का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


 
Top