वाशी (प्रतिनिधी)-  कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे येथील सुपुत्र प्रणव रमाकांत उंद्रे यांची भारतीय सैन्य दलातील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी मार्फत लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. शामसुंदर डोके, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. विलास गरड, प्रा. डॉ. विश्वास चौधरी तसेच प्रणव यांचे वडील रमाकांत उंद्रे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. विलास गरड यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना सांगितले की, प्रत्येकाकडे बुद्धिमत्ता असते पण प्रयत्नांची जोड दिल्यासच ध्येयप्राप्ती होते. मुलींनाही सैन्यात करिअर करण्याच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत.

प्रणव उंद्रे यांनी यावेळी सत्काराला उत्तर दिले. प्रभारी प्राचार्य प्रा. शामसुंदर डोके यांचेही अध्यक्षीय भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अजित तिकटे यांनी केले. सत्कारमूर्ती व पाहुण्यांचा परिचय प्रा. एम.डी. उंद्रे यांनी करून दिला. प्रा. कृष्णाली जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. अनिता लांडगे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top