वाशी (प्रतिनिधी)- जाणीव संघटनेचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष रामभाऊ लगाडे यांच्या दीर्घकाळ चाललेल्या सामाजिक बांधिलकीच्या कार्याची दखल घेत त्यांना दुहेरी सन्मान प्रदान करण्यात आला. कळंब तालुक्यातील मंगरूळ येथे आयोजित अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने त्यांना लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे पुरस्कार देण्यात आला. तसेच क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ, कळंब तालुका शाखेच्या वतीने “मानवता पुरस्कार“ देखील प्रदान करण्यात आला.

या सोहळ्यात पांडुरंग घोडके, दिलीप मोरे, दिलीप पाटोळे, सोमनाथ कसबे, दत्तात्रय गायकवाड आणि बी. एन. भंडारे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. रामभाऊ लगाडे हे गेली 35 वर्षे दलित, छोटे शेतकरी, शेतमजूर, महिला, मुले, विधवा, परित्यक्ता, गायरान अतिक्रमण धारक शेतकरी, वृद्ध, निराधार व दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देत आहेत. समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी उभा केलेला लढा व कार्याची ताकद लक्षात घेऊन त्यांना हा मानाचा गौरव मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.

या कार्यक्रमाला हनुमंत पाटोळे, सरपंच शिंदे मॅडम, श्रावण क्षीरसागर, आप्पा कांबळे, मारुती शिरसाट यांच्यासह जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सन्मानाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना रामभाऊ लगाडे म्हणाले, समाजातील शेवटच्या घटकासाठी काम करणे हेच माझे आयुष्याचे ध्येय आहे. मिळालेला हा सन्मान माझ्या कार्याला आणखी ऊर्जा आणि प्रेरणा देणारा ठरेल.


 
Top