वाशी (प्रतिनिधी)- येथील शिवाजी ज्ञान विहार शिक्षण मंडळाच्या अंकुरम विद्या मंदिर, वाशी येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांमधील तब्बल 130 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या कौशल्याची उत्तम प्रचीती दिली. ही स्पर्धा 14, 17 व 19 वर्षे वयोगट (मुले व मुली) अशा तीन विभागांमध्ये खेळविण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनोद पवार, संचालक राजेश आवटे, तालुका क्रीडा संयोजक अभय वाघोलीकर, तालुका क्रीडा सहसंयोजक सोमा केळे, पत्रकार शोएब काझी तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालकांच्या उपस्थितीत झाले. अध्यक्षीय मनोगतात डॉ. पवार यांनी विद्यार्थ्यांमध्ये रणनीती, एकाग्रता व विचारशक्ती विकसित करण्यासाठी बुद्धिबळ खेळाचे महत्त्व अधोरेखित केले. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी पंच म्हणून गोकुळदास गोरे, नंदकुमार सुरू, हरी मार्कंडेय, शेळके व शशिकांत पवार यांनी काम पाहिले. विजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या आयोजनासाठी अंकुरम विद्या मंदिर व्यवस्थापन समिती, शाळेचे क्रीडा शिक्षक एस. एम. पवार व शिक्षकवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.


 
Top