धाराशिव (प्रतिनिधी)- ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या 10 वर्षे सेवा झालेल्या आहेत. त्यांचे 100 टक्के समायोजन व प्रत्येक वर्षी 30 टक्यांप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभाग, ग्राम विकास व नगर विकास विभाग तसेच वैद्यकिय शिक्षण व संशोधन विभागामध्ये समावेशन करण्यात यावे यासह इतर मागण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समितीच्यावतीने जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी या मागणीसाठी पडत्या पावसात गुरूवार दि. 28 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर लॉग मार्च काढला होता.
दि.19 ऑगस्टपासून बेमुदत संप आंदोलन सुरू आहे. आज दि.28 रोजीचा 10 वा दिवस आहे. मात्र, यावर शासनाने अद्यापही तोडगा काढलेला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापासून भर पावसात ओले चिंब होत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लाँग मार्च काढीत आर्त टाहो फोडला. जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर सर्व कर्मचारी आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापासून निघालेला लाँग मार्च जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास धडकला. आंदोलकांनी विविध घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. तसेच या आंदोलनाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेत रूपांतर झाले.
शासन निर्णय दि.14 मार्च 2024 रोजी निर्गमित झाल्यापासून कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समावेशन करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे जोपर्यंत शासन स्तरावर पात्र कर्मचाऱ्यांचे समावेशन होईपर्यत, त्यांना सर्व सेवा समायोजीत केलेल्या कर्मचाऱ्यांप्रमाणे महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू करावेत. तसेच त्यांना सर्व नियमित शासकिय कर्मचाऱ्यांचे नियम व वेतन आयोगाच्या वेळोवेळी होणाऱ्या शिफारशीनुसार वेतन वाढ करावी किंवा समान काम समान वेतन लागू करावे. ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे रिक्त जागे समायोजन होणार नाही अशा सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांचे अधिसंख्य पदे निर्माण करुन समावेशन करावे.आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनामध्ये जीवन कुलकर्णी, किरण बारकुल, सतीश गिरी, किरण तानवडे, किशोर गवळी, अशोक चव्हाण, किशोर तांदळे, अमर सपकाळ, कलीम शेख, शर्मिला ठवरे, पठाण, रणखांब, सस्ते, गाढवे, संजय मुळे, रवींद्र यादव, विनोद मोरे, सुरेश पाटील, डॉ विक्रांत राठोड, गणेश चव्हाण, संतोष पोतदार, बाळासाहेब कोळेकर,विश्वजित जगदाळे, अमृत कुंभार आदींसह महिला व पुरुष कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
