धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ ढासळण्याच्या मार्गावर आहे. विद्यमान धाराशिव जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष प्रकाश विश्वनाथराव आष्टे यांनी अखेर पक्षाचा राजीनामा देत भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपला राजीनामा थेट अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सादर केला आहे.
आष्टे यांचा भाजप प्रवेश येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या उपस्थितीत एका भव्य कार्यक्रमात होणार आहे. गेल्या तीन दशकांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्या आष्टे यांनी जिल्हा परिषद, सहकार संस्था आणि शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या सुपुत्राचा जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव करून त्यांनी घराणेशाहीला दिलेलं आव्हान आजही राजकीय वर्तुळात लक्षवेधी मानले जाते.
