नळदुर्ग (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी ही संस्था उभी केली. आज या महाविद्यालयात शिक्षण घेतलेले विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत हे पाहून मनाला आत्मिक समाधान मिळते. असे मत माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केले. 

नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये मधुकरराव चव्हाण यांच्या 92 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वाढदिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयात वृक्षारोपण, वकृतत्व स्पर्धा व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास बालाघाट शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रामचंद्र आलुरे, सहसचिव शहबाज काझी, तेरणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सुरेश देशमुख, राष्ट्रवादीचे गोकुळ तात्या शिंदे, शफीभाई शेख, रोहित पडवळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष राठोड, कार्यालयीन अधिक्षक धनंजय पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांचा सत्कार प्राचार्य डॉ. सुभाष राठोड अधिक्षक धनंजय पाटील नॅक समन्वयक डॉ. शिवाजी घोडके, डॉ. उद्धव भाले, डॉ. विजय सावंत डॉ. समीर पाटील,एन.सी.सी. प्रमुख डॉ.आतिश तिडके यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड यांनी केले. 

याप्रसंगी पुढे बोलताना चव्हाण म्हणाले कि, वयाच्या वीस वर्षापासून मी समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झालो आणि तालुक्याचा विकास करण्यासाठी प्रयत्न केला. याकामी कै.सि. ना.आलुरे गुरुजी, कै.शिवाजीराव बाभळगांवकर व कै.नरेंद्र बोरगांवकर यांची मोलाची साथ लाभली. आम्ही चौघांनी एकत्र येऊन कुसळी गवताचा तालुका ओलीता खाली आणून शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास केला. या प्रसंगी रामदादा आलुरे, शाहबाज काझी, सुरेश देशमुख, गोकुळ शिंदे, शफी शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पवार यांनी केले. तर आभार अधिक्षक धनंजय पाटील यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 
Top