धाराशिव (प्रतिनिधी)- पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव येथे जिल्ह्यातील ड्रोन धारक, फोटोग्राफर व माध्यम प्रतिनिधींशी सुरक्षा विषयक विशेष बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीस धाराशिव जिल्ह्यातील खाजगी व शासकीय फोटोग्राफर, यूट्यूब मीडियाचे प्रतिनिधी, कॅमेरामन, ड्रोन ऑपरेटर तसेच जनसंपर्क कार्यालयाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत अधीक्षक शफकत आमना यांनी ड्रोन वापरासंदर्भातील डीजीसीए कडून आवश्यक परवानगी, लायसन्स व युनिक आयडेंटिफिकेशन नंबर प्राप्त करून घेण्याचे महत्व अधोरेखित केले.
विनापरवाना व बिनधास्त ड्रोन वापरामुळे सार्वजनिक व खासगी सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, याकडे उपस्थितांचे लक्ष वेधण्यात आले. तसेच नो-फ्लाय झोनमध्ये जसे की महत्त्वाची शासकीय आस्थापने, गर्दीची ठिकाणे, संवेदनशील भाग, धार्मिक स्थळे आणि दौऱ्यांच्या वेळीड्रोन वापरणे निषिद्ध असून, अत्यावश्यक परिस्थितीत अधिकृत परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. राजकीय कार्यक्रमांदरम्यान ड्रोनच्या वापराबाबत विशेष चर्चा करताना, अशा अनधिकृत वापरांमुळे संभाव्य धोके, खाजगी व शासकीय मालमत्तेची सुरक्षितता व व्यक्ति स्वातंत्र्य यावर कसा परिणाम होऊ शकतो, यावर ही सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी बैठकीत पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विविध माध्यम प्रतिनिधी, छायाचित्रकार, कॅमेरामन, ड्रोन धारक व जनसंपर्क कार्यालय धाराशिव येथील अधिकारी उपस्थित होते.