धाराशिव (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांना दमदाटी करणाऱ्या पोलिस प्रशासनातील अधिकाऱ्यांवर व दहशत माजविणाऱ्या पवनचक्की माफिया तसेच कंपन्यांवर कारवाई करावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात केली.
आमदार पाटील म्हणाले की, तांदूळवाडी गावामध्ये एका शेतकऱ्यांने दोन कंपनींना जमीन दिली. त्यात एक कंपनी एक रक्कम देते व दुसरी त्याहून कीतीतरी कमी देत असताना या शेतकऱ्यांने दोन्ही रक्कम सारखीच असावी अशी मागणी करतो तेव्हा कंपनीकडून दमदाटी करण्यात येते. शिवाय पोलीस प्रशासन त्या शेतकऱ्यांस त्याच्याच शेतात येऊन त्यानेच पीकविलेल्या ऊसाने त्यांना मारहाण करतात. एवढ्यावर ते शांत बसले नाहीत तर त्या शेतकऱ्यांस पोलीस ठाण्यात डांबून ठेवतात व पुढील कार्यवाही करण्यासाठी कंपनीस मुभा देतात. मग नेमक पोलीस प्रशासन कोणासाठी काम करत आहे याचे उत्तर सरकारने द्यावं असा थेट सवाल आमदार कैलास पाटील यांनी लक्षवेधीद्वारे सभागृहात केला. शिवाय खोटे दस्त तयार करून बनावट सह्या करून शेतकऱ्यांची फसवणूक हे कंपनीचे लोक करत आहेत. तक्रार देऊनही त्यांच्यावर साधा गुन्हा दाखल का होत नाही असा सवाल आमदार पाटील यांनी सरकारला विचारला. एवढेच नाही तर कंपनीकडून काही शेतकऱ्यांना धनादेश देऊ केले जातात व शेतात संपूर्ण काम देखील करतात व नंतर धनादेश बाऊन्स होण्याचे प्रकार घडले आहेत. कंपनीवाले पुन्हा काही कारण सांगतात किंवा फोन उचलत नाहीत. तेव्हाही शेतकऱ्यांना पोलिसांकडून कसलीच दाद मिळत नाही अशी माहिती आमदार पाटील यांनी सभागृहाच्या पटलावर ठेवली. यावर मंत्री पंकज भोईर यांनी सांगितले की, याबाबत चौकशी करण्यासाठी पोलीस महानिरीक्षक यांच्याकडून चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तेव्हा आमदार अमित देशमुख यांनी कंपनीचे, पोलीस अधिकारी व शेतकरी यांची नावे सभागृहासमोर ठेवण्यास सांगितलं. पण कंपनीचे नावच मंत्री भोईर यांच्याकडे नसल्याच त्यांनी सांगितलं तर तक्रारीत अधिकारी यांचं नाव नसल्याने त्यांचं नाव आपण घेतले नाही अशी पडकी बाजू मंत्री यांनी मांडली. त्यावर पुन्हा कैलास पाटील यांनी थेट उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड हे त्याठिकाणी आजही असं काम करत असून आताही तुम्ही माहिती घ्या असे आव्हान सरकारला दिले. शिवाय पाटील यांनी त्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा मंत्री भोईर यांनी फक्त उचित कारवाई करु असे सांगितले पण आमदार पाटील यांचे यावर समाधान झाले नाही त्यांनी अधिकाऱ्यांची बदली करावी व ही चौकशी कधीपर्यंत होईल अशी विचारणा केली. तेव्हा मंत्री भोईर यांनी त्यांच्याकडून सध्याचे काम काढून अन्य अधिकाऱ्याकडे देऊ व चौकशी लवकरात लवकर करु असे आश्वासन यावेळी दिले.