कळंब (प्रतिनिधी)- तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथर्डी येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाच्या महान परंपरेची जाणीव जागृती होऊन संस्कारक्षम पिढी घडावी या उद्देशाने बाळ गोपाळांच्या वारकऱ्यांची दिंडी गावात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यामध्ये विठ्ठल, रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत जनाबाई, टाळकरी, विणेकरी, वारकरी अशा विविध वेशभूषा करून आलेल्या भव्य दिव्य दिंडीचे गावभरात माता माऊलींनी औक्षष्ण करून पालखीचे स्वागत व पूजन केले. याप्रसंगी सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा, माजी सरपंच, ग्रामस्थ यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ पालखीचे पुजन,दर्शन करून श्रीफळ फोडून पुष्पहार अर्पण करून भव्य दिव्य स्वागत केले. या दिंडीमध्ये गावातील सर्व भजनी मंडळ यांनी विविध अभंग गायन करून विठ्ठलाच्या भक्तीचा महिमा गायला. अनेक विद्यार्थ्यांनी ज्ञानोबा विठ्ठोबा व विविध अभंग सादर करून भारतीय वारकरी संप्रदायातील संतांच्या कार्याचा महिमा गायला. या दिंडीमध्ये गावातील भजनी मंडळ, तरुण मंडळ, ग्रामस्थ, पालक ,महिला यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. माऊली माऊली ज्ञानोबा माऊली विठ्ठल विठ्ठल अशा विठ्ठलमय भक्तिमय वातावरणात विद्यार्थी रंगून गेले. कार्यक्रमाचा शेवट सर्व विद्यार्थी, ग्रामस्थ, वारकऱ्यांना केळी व चहा वाटप करून करण्यात आला. या दिंडीसाठी शाळेच्या वतीने मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड, सहशिक्षक धनंजय गव्हाणे, सरोजिनी पोते, मनीषा पवार, सुरेखा भावले यांनी परिश्रम घेतले.आरती करून दिंडीची सांगता करण्यात आली.