धाराशिव  (प्रतिनिधी)- पाच हजाराचे 50 हजार रुपये वसूल केलेले आहेत. तरी देखील त्यांनी आणखी पैसे दे म्हणत पैसे घेतलेल्या व्यक्तीला काठीने  काळा-निळा होईपर्यंत सावकार व त्याच्या दलालाने बेदम मारहाण करीत जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. तो व्यक्ती रुग्णालयात उपचार घेत आहे. मात्र अद्यापही पोलिसांनी त्यांचा जबाब घेतला नाही किंवा गुन्हा दाखल करण्याची साधी तसदी देखील दाखविलेली नाही. नुकताच धाराशिव शहरात बोकाळलेल्या अवैध सावकारकीने केशेगाव येथील कोळगे या व्यक्तीचा बळी घेतला आहे. तसाच दुसरा प्रकार धाराशिव शहरातच घडला असून या सावकाराचे जाळे कोणाच्या आशीर्वादाने मजबूत झाले व होत आहे ? ते जाळे पोलीस अधीक्षक रितू खोखर उध्वस्त करून सावकारकीला आळा घालतील का ? असा प्रश्न सर्वसामान्यांमधून विचारला जाऊ लागला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धाराशिव शहरातील धारासुर मर्दिनी देवी मंदिर परिसरात असलेल्या तानाजी राम साकतकर यांनी तीन वर्षांपूर्वी धारासुर मर्दिनी मंदिर परिसरातीलच सावकार असलेल्या व्यक्तीकडून  5 हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्या व्याजापोटी दर महिन्याला एक हजार रुपये सावकाराला दिले जात होते. मात्र, तो माझे अजून तुझ्याकडे पैसे राहिले असून ते दे असे म्हणत तगादा लावून साकतकर यांची 40-45 हजार रुपयांची पान टपरी ओढून नेली. माझे अजून तुझ्याकडे पैसे राहिले असून तुझे राहते घर माझ्या नावावर करून दे असे म्हणत शिवीगाळ व मारहाण करीत राहिला. त्यामुळे त्याच्या पत्नी राधा यांनी धुनी भांडी करून त्यातून मिळणाऱ्या मजुरीपैकी दर महिन्याला दोन-तीन हजार रुपये सावकाराला देणे सुरूच ठेवले. मात्र, पैशाची हाव सुटलेल्या व पैशाला हपापलेल्या या सावकाराने दि.14 जुलै रोजी सायंकाळी 8 ते 9 वाजण्याच्या सुमारास साकतकर यांना घरातून आडत लाईन येथील बाजार समिती मैदानाकडे ओढीत नेत त्यास सावकाराने व त्याच्या दलालाने दोघांनी काठीने जिवघेणी बेदम मारहाण केली. या मारहाणीत साकतकर यांच्या संपूर्ण अंगावर ओळ असून संपूर्ण शरीर अक्षरशः काळे-निळे पडलेले आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नी व इतर नातेवाईकांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. साकतकर यांच्यावर उपचार सुरू असतानाच सावकाराने दवाखान्यात रुग्ण उपचार घेत असलेल्या ठिकाणी येऊन दोघा पती-पत्नीला तुम्ही घराकडे या मी तुमचे बघतो असे म्हणत धमकी दिली. 


मला व माझ्या कुटुंबाला सावकार व दलाल हे त्यांचे पैसे दिलेले असताना देखील ते सातत्याने त्रास देत आहेत. त्यांचे संपूर्ण पैसे दिले असून त्यांनी माझी पान टपरी देखील त्या पाच हजार रुपयांमध्ये ओढून नेलेली आहे. मात्र, ते अजून माझ्याकडे पैसे आहेत. त्या पैशाच्या बदल्यात ते माझे घर लिहून दे असा तगादा लावत आहेत. तसेच ते रात्री बेरात्री घरी येऊन शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देतात. माझ्या घरी आई, वडील, पत्नी व मुलगी आहे. ते सतत त्रास देत असल्यामुळे त्यांच्यापासून मला व माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आम्हाला न्याय द्यावा अशी आर्त मागणी पीडित तानाजी साकतकर व राधा साकतकर या पती-पत्नीने केली आहे.


साकतकर हे तीन दिवसांपासून रुग्णालयात बेडवर उपचार घेत आहेत. संबंधित सावकार व दलाल यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी त्यांच्या पत्नीने रुग्णालयातील पोलीस चौकीतील पोलिसांकडे वारंवार मागणी केली. त्यामुळे पोलीस जबाब घेण्यासाठी साकतकर यांच्याकडे आले. जबाब घेण्याची प्रक्रिया सुरू असताना पोलिसांना कोणाचातरी फोन आला. त्यामुळे त्यांनी तो जबाब तसाच अर्धवट ठेवून ते तेथून निघून गेले. विशेष म्हणजे अद्यापपर्यंत पोलिसांनी त्यांचा जबाब घेतला नाही किंवा संबंधित सावकारा विरोधात तक्रार दाखल केलेली नाही. 

त्यामुळे पोलीस प्रशासनाचे“सद्रक्षणाय खलनिग्रहणाय“हे ब्रीदवाक्य असून सज्जनांचे रक्षण करणे आणि दुर्जनांचा नायनाट करणे असा अर्थ आहे. मात्र, वरील कृतीवरून पोलीस नेमके सज्जनांचे रक्षण करीत नसून दुर्जनांना मदत करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी आपला खाक्या दाखवावा अशी नागरिकांतून मागणी होऊ लागली आहे.

 
Top